– काँग्रेसचे सर्व सभापती बिनविरोध निवडून
गोरेगांव :- गोरेगांव नगर पंचायत समिती सभापतींची निवडणूक दिनांक ३० जानेवारी रोजी अत्यंत शांततेत पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड आणि मुख्याधिकारी अक्षय परदेशी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.
नगर पंचायतमध्ये काँग्रेस प्रशासनाचा पहिला बांधकाम सभापती म्हणून पवन रहांगडाले यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील जलपुरवठा योजनेतील सततच्या त्रुटी लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाचे सभापतीपद अनुभवी काँग्रेस नेत्या व माजी सरपंच रंजना बारेवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे सभापतीपद तिमेश्वरी पटले यांना देण्यात आले असून, शहरातील आरोग्य विभागाची गंभीर स्थिती पाहता नगर उपाध्यक्ष मल्लेशाम येरोला यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गोरेगांव नगर पंचायतमध्ये भाजपचे ५ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ नगरसेवक असतानाही सर्व समिती सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. या वेळी नगराध्यक्ष तेजराम बिसने, नगर उपाध्यक्ष मल्लेशाम येरोला, भाजप गटनेते आशीष बारेवार तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
शहर विकासासमोर अनेक मोठी आव्हाने
गोरेगांव नगर पंचायतमध्ये आता काँग्रेसचे प्रशासन कार्यरत होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शहर विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आता काँग्रेसच्या नगरसेवकांवर आहे.
सध्या शहर अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामध्ये पवन तलाव सौंदर्यीकरण, श्रीरामपूर परिसरातील पाणीटंचाई, घनकचरा व्यवस्थापन, तसेच विकासकामांसाठी निधीचा अभाव या प्रमुख समस्या आहेत. राज्यात भाजपचे सरकार असून, क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे भाजपचे असल्याने, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवणे ही नगर पंचायत प्रशासनासमोरील मोठी कसरत ठरणार आहे.




