◼️नगरधन किल्ल्यातली भवानी माता भाविकांचे श्रद्धा स्थान
◼️रास गरबा, देवी जागरण आणि महाकाल तांडव
सचिन चौरसीया, रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथील वाकाटककालीन किल्ल्यात माँ भवानी मातेच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरवात झाली आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेच्या अनोखा संगम असलेल्या या नवरात्रोत्सवासाठी जय मा भवानी नवरात्र उत्सव मंडळ किल्ला नगरधन यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्राचीन काळापासून राजे-महाराजे युद्ध किंवा पराक्रम सुरू करण्यापूर्वी देवीची पूजा करीत असे आणि आजही नगरधन किल्ल्यात या परंपरेचे पालन होत आहे. आत प्रवेश केल्यानंतर भवानी मातेची मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेते. ‘जय माँ भवानी नवरात्र उत्सव मंडळ’ नगरधन यांच्या प्रयत्नांनी हा उत्सव गत २६ वर्षापासून भव्य स्वरूपात साजरा होतो. किल्ल्याचा संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई केली जाते आणि गावातील मुख्य रस्तांवर आकर्षक विद्युल रोषणाई करण्यात येते, त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी देवीची आरती, रास गरबा, देवी जागरण आणि महाकाल तांडव यासारख्या कार्यक्रमामुळे नगरधन मध्ये नऊ दिवस भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. या उत्सवासाठी नगरधनसह रामटेक तालुक्यासह इतर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.








