– गटशेतीतून आधुनिक व सेंद्रिय शेतीची यशस्वी वाटचाल; ‘श्री’ पद्धतीने धान लागवड करून खर्चात बचत, उत्पादनवाढीचा निर्धार
पंकज परशुरामकर, इनसाइडर न्युज टुडे प्रतिनिधी
महागाव :- महागाव येथील ‘सावित्री शेतकरी मित्र गटाने’ एकजुटीच्या बळावर आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचा आदर्श निर्माण करत परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. पारंपरिक शेतीपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सामूहिक श्रमातून शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या या गटाने कमी खर्चात अधिक उत्पादनाचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे.
पाणी फाउंडेशन फार्मर कप – २०२६ च्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत गटातील सदस्यांनी एकत्रित शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. प्रत्येक सदस्याच्या शेतात सामूहिकरीत्या काम करत नांगरणी, गादीवाफे तयार करणे, निंबोळीच्या गोळ्यांची पावडर तयार करणे, दशपर्णी अर्काची निर्मिती करून त्याची फवारणी करणे, तसेच कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे आणि पक्षी थांबे उभारण्यासारखे पर्यावरणपूरक उपाय अवलंबले. त्यामुळे रासायनिक औषधांवरील अवलंबित्व कमी करत सेंद्रिय शेतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गटातील सदस्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतीची मशागत केली आणि त्यानंतर ‘श्री (SRI) पद्धतीने’ धान लागवड केली. धान लागवडीच्या वेळी मार्गदर्शक येरणे यांनी स्वतः शेतात उतरून महिलांसोबत धान लागवड करत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहभागामुळे गटातील सदस्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला.
या गटामध्ये निर्मला नाकाडे, कुसुम झोळे, गीता गहाणे, दुर्गा ठाकरे, पुष्पा डोंगरवार, ललिता नाकाडे, आशा देशमुख, निकिता भजने, शोभा मेश्राम या महिला सदस्यांसह भुवन गहाणे आणि राहुल झोळे या पुरुष सदस्यांचा समावेश असून एकूण ११ सदस्य सामूहिक शेतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रत्येकाच्या शेतात जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून धान लागवड केली जात असून सहकार्य, समन्वय आणि परस्पर विश्वासाचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
गटशेतीमुळे मजुरांवरील खर्चात मोठी बचत झाली असून वेळेचे योग्य नियोजनही शक्य झाले आहे. कमी खर्च, अधिक कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे उत्पादनवाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीतील प्रत्येक कामात सक्रिय सहभाग नोंदविल्याने महिला सक्षमीकरणालाही नवी दिशा मिळाली आहे.
महागावातील ‘सावित्री शेतकरी मित्र गटाचा’ हा प्रयोग केवळ सामूहिक शेतीचा आदर्श नसून आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, श्रमदान आणि सामाजिक एकोप्याचा संगम आहे. भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी अशा गटशेतीचा अवलंब केल्यास शेती अधिक किफायतशीर, शाश्वत आणि उत्पादनक्षम होण्यास निश्चितच मदत होईल.
“एकीचे बळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. महागावच्या ‘सावित्री शेतकरी मित्र गटाने’ कृतीतून हा आदर्श संपूर्ण परिसरासमोर उभा केला आहे.”





