◼️शेणखताला तब्बल ४५०० ते ५००० रुपये प्रतिट्रॉली
◼️शेणखताला आले सुगीचे दिवस; खरीप च्या तोंडावर मागणी वाढली!
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- रासायनिक खतांच्या सतत वाढणाऱ्या किमती, जमिनीची घटती सुपीकता आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्ग पुन्हा पारंपरिक आणि नैसर्गिक शेती पद्धतीकडे वळताना दिसत आहे. यामुळे शेणखताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी झाल्याने जादा पैसे मोजणी शेणखत मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याच बदलत्या प्रवाहामुळे शेणखताला अभूतपूर्व मागणी निर्माण झाली असून, सध्या बाजारात शेणखताला तब्बल ४५०० ते ५००० रुपये प्रतिट्रॉली असा दर मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेणखताला अक्षरशः सोन्याचा भाव आल्याची चर्चा रंगत आहे. ग्रामीण भागात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू असून, खताची मागणी वाढली आहे. शेणखत हे पारंपरिक सेंद्रिय खत असून, शेतकऱ्यांचा आजही या खताकडे कल आहे; परंतु गुरांची संख्या कमी झाल्याने शेणखताचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. पेरणीपूर्व मशागतीचे दिवस जवळ आले आल्याने शेतात शेणखत टाकण्याची लगबग सुरू आहे. पूर्वी शेतीसोबतच पशुपालन केले जात असे. त्यामुळे शेणखत सहजपणे मिळत होते. यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या अशा पशुधनाची संख्या घटली आहे. शेती वाचवण्यासाठी, शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर महत्त्वाचा असून, शेतकरी मिळेल त्या किमतीला शेणखत विकत घेऊ लागले आहेत. रामटेक तालुक्यातील विविध गावांतील शेतकर्यांकडून शेणखताला मागणी वाढली आहे.
पिकांसाठी चांगलेच !
शेणखताचे अनेक फायदे आहेत. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीतील गांडुळांचा वावर वाढतो, पांढऱ्या मुळींची वाढ होऊन पीक हंगामात निरोगी राहते, शेणखताचा वापर केल्यास उत्पादन चांगले येऊन उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांना शेणखताचे महत्व आहे.
शेणखताला आहे ‘वेटिंग’ !
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाकडे आपला मोर्चा वळविला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर वाढविला आहे. शेतकऱ्यांकडे पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शेणखत वापर, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त !
१) कधी वापरावे ?: पेरणीपूर्व मशागती दरम्यान शेणखत वापरणे सर्वात उपयुक्त. जमिनीत खत नीट मिसळून द्यावे.
२ ) किती वापरावे?: एका एकरासाठी सरासरी ३० ते ५० ट्रॉली शेणखत आवश्यक (जमिनीचा प्रकार व पिकानुसार बदलू शकते).
३) कुठे मिळेल? : स्थानिक पशुपालक, कृषी सहकारी संस्था, सेंद्रिय शेती करणाऱ्या उत्पादक गटांकडून.
४ ) गुणवत्तेची तपासणी कशी करावी? : शेण सडलेले, ओलसर आणि गंधविरहित असावे. जास्त कचरा व अर्धवट कुजलेले खत टाळावे.
५ ) जतन कसे करावे? :शेणखत आडसावाखाली ढीग करून ठेवल्यास त्यातील पोषणमूल्य टिकते. उघड्यावर ठेवू नये.
६) खर्च वाचवायचा का?:गटशेती किंवा शेतकरी उत्पादक गटांद्वारे सामूहिक खरेदी करा.वाहतूक खर्च व दर सवलतीचा लाभ मिळतो.



