spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संकटाच्या काळात रिअल इस्टेट परिवार ठामपणे उभा राहिला 

– भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनची मानवतेची प्रेरणादायी मिसाल

नागपूर :- भारतीय रिअल इस्टेट सल्लागार / एजंट वेल्फेअर युनियनने संघटना केवळ व्यावसायिक हितासाठी कार्यरत नसून सदस्यांच्या सुख- दुःखात कुटुंबाप्रमाणे खंबीरपणे साथ देणारी सामाजिक संघटना असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. युनियनच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष स्व.वीरेश ढोके यांचे काही दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती अचानक गमावल्याने परिवारासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले. या कठीण प्रसंगी भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनच्या राष्ट्रीय टीम (नागपूर) ने संवेदनशीलता दाखवत अकोला जिल्हा व अकोला पूर्व झोनच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्व. वीरेश ढोके यांच्या परिवाराला ₹५१ हजारांची आर्थिक मदत दिली. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य न ठरता संपूर्ण रिअल इस्टेट परिवाराच्या आपुलकीची, सामाजिक बांधिलकीची आणि एकजुटीची जिवंत साक्ष ठरली. युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजवीर सिंह यांच्या हस्ते ही आर्थिक मदत ढोके परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमासाठी नागपूर राष्ट्रीय टीमने घेतलेला पुढाकार, पदाधिकाऱ्यांमधील उत्कृष्ट समन्वय आणि मानवी मूल्यांप्रती असलेली बांधिलकी विशेष कौतुकास्पद ठरली. या प्रसंगातून संकटाच्या काळात कोणताही सदस्य किंवा त्याचे कुटुंबीय एकटे नसल्याचा विश्वास युनियनने कृतीतून दिला. संघटित नेतृत्व आणि परस्पर सहकार्याची ताकद या उपक्रमातून अधोरेखित झाली. यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष आतिष तायडे, कार्यकारी अध्यक्ष निलेश देशपांडे, उपाध्यक्ष अजय गवळी, उपाध्यक्ष श्याम डोंगरे, सचिव विठ्ठल चिंतामणी, पीआरओ शिवाजी गावंडे, मीडिया प्रमुख पवन वानखडे, अजय वांडेकर, सहसचिव व कोषाध्यक्ष आशिष देवकते, अकोला पूर्व झोन अध्यक्ष गोपाल कोगदे, सचिव दीपक पाटील, महेश राहुडकर, एकनाथ वानखडे, गणेश चिंचोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी युनियनच्या वतीने रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रत्येक सल्लागार आणि एजंटने केवळ व्यावसायिक नाते न ठेवता एक कुटुंब म्हणून परस्परांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. एखाद्या सदस्यावर संकट ओढवले तर संपूर्ण रिअल इस्टेट समाजाने त्याच्या मदतीसाठी धावून जाणे, हीच सक्षम, सुसंघटित आणि संवेदनशील समाजाची खरी ओळख असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. “संघटनेची खरी ताकद सदस्यसंख्येत नसून परस्परांप्रती असलेल्या विश्वास, जबाबदारी आणि सहकार्याच्या भावनेत असते,” असा संदेश भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनने दिला. अकोला येथे राबविण्यात आलेला हा मानवतावादी उपक्रम संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून “एकजूट असेल तर कोणतेही संकट मोठे नसते,” हा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.