गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) परिसरात 9 जानेवारीला एका नरभक्षक बिबट्याने १४ वर्षांच्या मुलाला ठार मारले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नरभक्षक बिबट्याची भीती पसरली. बिबट्याच्या उपस्थितीमुळे अनेक गावांमधील मुलांना शाळेत जाणे बंद करावे लागले, ज्यामुळे शिक्षणावर परिणाम झाला.
खडकी, डोंगरगाव, नीमगाव, बुधाटोला आणि रत्नापूर ही गावे घनदाट जंगलांनी वेढलेली असल्याने, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. संध्याकाळनंतर लोक घराबाहेर पडण्यासही घाबरत होते.
वन विभागाच्या पथकाने सलग नऊ दिवस जोरदार मोहीम राबवली. विविध ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आणि पिंजरे लावण्यात आले. अखेर १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता खडकी गावाजवळील एका तलावाजवळ नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले.
बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे आणि आता जनजीवन पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.




