spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

युद्धाचा विळखा स्वयंपाकघराला..! आम्ही काय चुलीवर स्वयंपाक करायचा का ? वाढत्या दरांमुळे नागरिक ‘गॅस’वर, संतापून म्हणाले

खापा, वार्ताहर :- जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे गडद सावट आता थेट सर्वसामान्यांच्या ताटावर पडू लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ केली आहे. ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडले असून, सामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधी जीवनाआवश्यक वस्तू महागल्या आहेत. त्यात आता घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ झाल्याने सामान्यांना यांची झळ बसत आहे.

तसेच व्यावसायिक सिलिंडर ११५ रूपयांनी महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. गॅस तुटवड्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी घरगुती पुरवठा सुरळीत आहे, पण दोन बुकिंगमधील अंतर १५ वरून २१ दिवसांवर करण्यात आले आहे. यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून सामान्य नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून नियम लागू होती. पण या नव्या नियमांमुळे काही कुटुंबांना अडचण निर्माण झाली असून या नियमात सवलत द्यावी अशी गॅस सिलेंडर एजन्सीची मागणी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन गॅस वितरकाने नागरिकांना केली आहे.

“दरवाढ परवडणारी नाही.”

घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ आम्हाला परवडणारी नाही. सामान्य कुटुंबातील महिलांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र गॅस सिलेंडरच्या भावामध्ये वाढ झाली आहे यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे. आता आम्ही चुलीवरती स्वयंपाक करायचा का ? असा रोखठोक सवाल संतप्त महिलांना, गृहिणींनी विचारला आहे.

“गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची बुकिंगसाठी धाव”

दरम्यान अमेरिका-इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावरील मेसेजमुळे नागरिक घाबरले असून ग्रामीण भागातील नागरिकांनी बुकिंगसाठी धाव घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही, घरपोच गॅस पुरवठा नियमित सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 – सामान्यांच्यांचे असेही संतप्त सूर-

आधीच डाळी, तेल आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे गणित कसे जुळवायचे, हा मोठा प्रश्न आहे.

– मिनाज शेख, गृहणी, खापा.

युद्धजन्य परिस्थितीचा सामान्यांना जोरदार फटका बसत आहे. व्यावसायिक गॅसला बरोबर आता घरगुती सिंलिडर गॅस नवीन दराची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली असून, बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही नवीन दरानेच पैसे मोजावे लागले आहेत.

– सुनील जांगडे, हॉटेल व्यावसायिक, खापा.

महागाई ने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात ही घरगुती गॅस सिलिंडरच्या भावात वाढ म्हणजे माझ्यासाठी ढेप मधून तेल काढण्यासारखे झाले आहे.

-मिनाक्षी गणवीर, गृहिणी, कोदेगाव.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.