किशोर साहू, मौदा, ता. २० :- धानपट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौदा व रामटेक तालुक्यात धान पीक आठ ते दहा दिवसात मोठ्या प्रमाणात कापणीला येणार असून धान कापणी करण्यापूर्वी धानाची लागवड केलेल्या बांध्यांमध्ये गव्हाचे पीक घेण्यासाठी गव्हाची पेरणी करण्याऐवजी सध्या धान्याच्या ओल्या असलेल्या बांध्यात गेहू फेकण्याचे काम रामटेक व मौदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसत आहे. याबाबत सावरगाव येथील शेतकरी दिनेश काटोके यांना विचारपूस केली असता, धान कापण्याच्या आठ ते दहा दिवसांपूर्वी गहू फेकण्याचे काम पूर्ण करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गहू पेरणे ऐवजी गहू फेकनी केल्यास गव्हाला थंडीच्या कालावधीत जास्त मिळत असल्याने गव्हाचे उत्पन्न पेरीव गव्हापेक्षा फेकिव गव्हात जास्त असल्याचे खेडी येथील शेतकरी अरुण इंगळे यांनी सांगितले.

धानाची कापणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील मजूर वर्ग मौदा व रामटेक तालुक्यातील गावागावात दाखल व्हायला सुरुवात झाल्याचे शेतकरी सांगत आहेत .आठ दिवसात संपूर्ण मजूर वर्गाच्या गॅंगा दाखल झाल्यानंतर रामटेक व मौदा तालुक्यात धान कापणी युद्ध पातळीवर सुरू होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर ज्या शेतकऱ्यांची धान कापणीला आलेले आहे , त्यांनी मशीन ने धान कापायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापासून रामटेक व मौदा तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने हिरव्या मिरचीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने हिरव्या मिरचीचे दर 19 रुपयावरून 29 रुपयापर्यंत झाल्याचे म्हणजेच प्रति किलो दहा रुपये वाढल्याचे तर जुन्या धानाचे दर पाच हजार रुपये खंडीवरून 4600 म्हणजेच 400 रुपये घसरल्याचे खोपडी येथील शेतकरी कृष्णा भोस्कर यांनी आज बुधवार (दि. 19 नोव्हेंबर)ला वार्तालाप करताना सांगितले.




