spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पद्मश्री पुरस्कृतांचे कार्य महान ; सर्वांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी – माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई

Ø नागपूर विद्यापीठाच्यावतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार  

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ओजस्वी विचाराद्वारे त्याग व सर्मपणातून समाजसेवा कारणारी व्यक्ती ही महान असल्याचे उदधृत केले आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती या महान असून समाजातील प्रत्येकाने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, अशा भावना भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. मनाली क्षिरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुल सचिव डॉ. राजू हिवसे, अधिसभा सदस्य तथा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनमोहन वाजपेयी आदी यावेळी उपस्थित होते.

न्या. भूषण गवई म्हणाले, विदर्भातील १० रत्नांनी आपल्या अलौकिक कार्याची छाप सोडत भारत सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मान असणाऱ्या पद्मश्री पुरस्कारावर नाव कोरले. नागपूर विद्यापीठाने या सर्व महान व्यक्तींचा नागरी सत्कार करुन त्यांचे कार्य पुन्हा समाजासमोर आणले आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वसामान्यांना दिलेले अधिकार दुर्गम भागातील नागरिकांपर्यत पोचविण्याचे प्रभावी कार्य या मान्यवरांनी केले आहे. आरोग्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या या महान व्यक्तींनी आपल्या कार्यातून एकसंध भारताचे प्रतिबिंबही दर्शविले आहे. या सर्व पद्मश्री पुरस्कृत व्यक्तींच्या कार्याचा समान धागा हा सेवाभाव व समाज सेवेच्या व्रताचा आहे. आपल्या कार्याने महान झालेल्या या सर्व व्यक्तींकडून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वानुभव व आपल्या खुमासदार व अभ्यासू शैलीत त्यांनी या समारंभात नागरी सत्कार स्वीकारलेल्या पद्मश्रींच्या कार्याचा गौरवही केला.

पद्मश्रींचा झाला नागरी सत्कार

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांचा दरवर्षी केंद्र शासनाच्यावतीने ‘पद्म पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करण्यात येतो. यातील ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित विदर्भातील मान्यवरांचा या समारंभात नागरी सत्कार झाला. मेळघाट क्षेत्रातील आदिवासींना आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, जागतिक ख्यातीचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, होमियो पॅथीतील व्रतस्थ डॉ. विलास डांगरे, झाडीपट्टीचे श्रेष्ठ कलावंत डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ समाज सेवक तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांना गौरविण्यात आले.

अनाथ, अपंगांसाठी आयुष्य वेचणारे समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित असल्याने त्यांची मानस कन्या गांधारी यांनी नागरी सत्कार स्वीकारला. विख्यात उद्योजक व सोलार गृपचे प्रमुख सत्यनारायण नुवाल वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यावतीने त्यांचा नातू हर्ष नुवाल यांनी तसेच केरळ मधील वायनाड जिल्ह्यात आरोग्य सेवा देणारे डॉ. धनंजय सगदेव काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या वतीने त्यांचे बंधू विंग कमांडर विनय सगदेव यांनी सत्कार स्वीकारला. प्रसिध्द साहित्यिक डॉ. नामदेव कांबळे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत.

कुलगुरू डॉ. मनाली क्षिरसागर यांनी प्रास्ताविक केले तर अधिसभा सदस्य तथा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनमोहन वाजपेयी यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.