– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन; वर्धा नदीवरील नवीन पुलासोबत बंधारा बांधण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
जलालखेडा :- नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे वर्धा नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलासोबत बंधारा बांधण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास मोवाड ते खरगडदरम्यानच्या सुमारे १७ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ तसेच पशुधनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वर जलालखेड्याजवळ वर्धा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुलासोबतच नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी जलालखेडा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. वर्धा नदीतील पाणी दुसऱ्या दिशेने वळविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. याचा परिणाम शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भूजल पातळी घसरल्याने अडचणीत वाढ
परिसरात भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. त्याचबरोबर ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रस्तावित पुलासोबत तांत्रिकदृष्ट्या जलसाठ्याची व्यवस्था केल्यास किंवा स्वतंत्र बंधारा उभारल्यास पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होईल.
यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यासोबतच भूजल पातळी उंचावण्यास मदत होऊ शकते. परिणामी परिसरातील गावांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे.
१७ गावांना मिळणार लाभ
जलालखेडा येथे बंधारा उभारल्यास मोवाड ते खरगडदरम्यानच्या सुमारे १७ गावांना त्याचा लाभ मिळू शकतो. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी आणि पशुधनाला आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे परिसरातील शेती आणि ग्रामीण विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गडकरी यांना निवेदन; मागणीला सकारात्मक प्रतिसाद
या मागणीसाठी जलालखेडा येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. नवीन पुलासोबत वर्धा नदीवर बंधारा बांधण्याची आवश्यकता शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर गडकरी यांनी पुलासोबत बंधारा उभारण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. त्यांच्या प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी कुलदीप हिवरकर, मनोज खुटाटे, नितीन नागपुरे, पवन कलंबे, सत्यम चौधरी, मृणाल वासडे आणि मोहनसिंह चव्हाण उपस्थित होते.






