spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर BPHU परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य; कर्मचारी, नागरिक त्रस्त

– कचरा, दुर्गंधी, चिखल आणि साचलेल्या पाण्याच्या समस्येकडे मनसेचे लक्षवेध; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

हंसराज,तुमसर :- तुमसर येथील तालुका सार्वजनिक आरोग्य कक्ष (बीपीएचयू) परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचणे, दुर्गंधी पसरणे तसेच पावसाचे पाणी तुंबून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने कर्मचारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाचीच दयनीय अवस्था झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कार्यालयात ये-जा करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता नसल्याने पावसाळ्यात कर्मचारी आणि नागरिकांना चिखलातून मार्ग काढत कार्यालयात पोहोचावे लागत आहे. तालुका सार्वजनिक आरोग्य कक्ष हे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण, संसर्गजन्य आजारांचे निरीक्षण व नियंत्रण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. तालुक्यातील आरोग्य केंद्रांकडून आजारांची आकडेवारी संकलित करून तिचे विश्लेषण करणे, जिल्हास्तरावर समन्वय साधणे तसेच प्रगत निदान व प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या केंद्रामार्फत केले जाते. मात्र अशा महत्त्वाच्या कार्यालयातच अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. परिसराची तातडीने स्वच्छता करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे तसेच कार्यालयापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजभिये, तुमसर शहराध्यक्ष निखिल कटारे, शहर सचिव लोकेश कामथे, तालुका संघटक रोशन ढोके, शहर संघटक सलमान पठाण, आशिष माटे, विकास प्रजापती, विवेक डहरवाल, रोहित शिवरकर, मिलिंद मदनकर, विकी पांडे आणि हर्षु कठाने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.