– वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वन विभागाचा आढावा
– बचत गटाच्या महिलांनी प्रदर्शनीत ठेवल्या विविध वस्तू
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- वन विभागाशी संबंधित विविध विषयांचा आणि महिला बचत गटाकडून निर्मित वस्तूचे आढावा घेण्यासाठी (दि.२४) नोव्हेंबर रोजी नागपूर येथील हरिसिंग सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. जंगलावरील लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पेज वाद्य प्रकल्पाकडून पर्यायी रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि महिला बचत गटांनी सुंदर वस्तू तयार केल्या. वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी प्रदर्शनीला भेट दिली. या प्रसंगी पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समुदायाभिमुख उपक्रमांचे तसेच त्या माध्यमातून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. या बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव; प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) व मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी तसेच इतर वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते. स्थानिक समुदायांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करणे आणि त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रदर्शनाद्वारे वनमंत्री नाईक यांना स्थानिक समुदाय आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली असून आकर्षक वस्तू पाहून यावेळी वनमंत्र्यांनी सदर वस्तूचे कौतुक केले. तसेच सुवरधारा येथील महिला बचत गटांमार्फत राबविण्यात येणारे कापडी पिशव्या व इतर शिलाई प्रकल्प या विषयीची माहिती देण्यात आली. वनमंत्री नाईक यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करत, हे उपक्रम स्थानिक समुदायविकास आणि रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. हे प्रदर्शन क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी, उपसंचालक अक्षय गजभिये तसेच सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगांवकर व संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. यावेळी देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) अभिजीत इलमकरलिखित ‘रिदम ऑफ दि वाईलल्ड-व्हाईस ऑफ द अनहिअर्ड’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
प्रदर्शनीची वैशिष्ट्ये
पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रांतर्गत आकर्षक गोधड्या, तसेच पर्यावरणपूरक गणपती मूर्ती व दिवे, पश्चिम पेंच, कोलितमारा क्षेत्रांतर्गत तेराकोटा मातीपासून बनविलेली सुबक शिल्पकला आणि आभूषणे, नागलवाडी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रांतर्गत आवळेघाट येथील ‘शिवराज्य डेअरी’ मध्ये तयार होणारे ‘पेंचअमृत’ शुद्ध देशी तूप, पेढे, खवा, कापडी पिशव्या आदी उत्पादने प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये ठरली.




