– प्रत्येक झोन कार्यालयात 9 व 10 मे रोजी शिबीर
नागपूर :- पाणी बिलाच्या संदर्भात नागरिकांच्या असलेल्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जलप्रदाय विभागाने शनिवार ९ व १० मे रोजी प्रत्येक झोन कार्यालयांमध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबीर आयोजित केले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समितीच्या सदस्यांनी पाणी बिल संदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन दिवसांचे शिबीर घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणा-वखरे यांनी जलप्रदाय विभागाला शिबीर आयोजित करण्याचे निर्देश दिले होते.
महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे व उपसभापती विजय झलके यांच्या मार्गदर्शनात जलप्रदाय विभागाने शहरातील 10 झोनमध्ये शिबीरे आयोजित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. जलप्रदाय विभागाने यासाठी मानक कार्यरत प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे.
सर्व झोन मध्ये शिबीरे होणार
यानुसार जलप्रदाय विभागाने लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये येत्या 9 व 10 मे रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जलप्रदाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या पाणी बिलाच्या संदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करणार आहेत. या संधीचा नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी केले आहे.