सचिन चौरसिया,रामटेक :- एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.११) सकाळी दहाच्या सुमारास रामटेक अंबाळा वार्ड, प्रभाग क्र.२ येथे उघडकीस आली. मयंक योगेंद्र द्रुगकर (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मयंकला इंजिनीयर कॉम्पुटर सायन्स मध्ये अपेक्षित प्रवेश न मिळाल्याने मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते. घटनेच्या दिवशी मयंकचे वडील कामानिमित्त बाहेर गेले तर आई आणि बहीण मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे संधी साधून मयंकनी टोकाचे पाऊल उचलले. मयंकने याच वर्षी १२ ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुढील शिक्षणासाठी त्याला कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रवेश घ्यायचा होता मात्र अपेक्षित अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्याने तो तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आई मंदिरातून घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निर्देशातील तिने तातडीने मयंकला उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांचे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करीत आहे.








