spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केशोरीच्या हिनाची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी!

– ४८ किलो गटात १७५ किलो वजन उचलत द्वितीय क्रमांक; केशोरीच्या कन्येचा राष्ट्रीय स्तरावर डंका

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे 

नवेगाव बांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील कु. हिना मनोहर आरसोडे हिने पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर केशोरी गावासह अर्जुनी मोर तालुक्याचे नाव उंचावले आहे. रायपूर येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी युनायटेड पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, छत्तीसगड, रायपूर यांच्या वतीने आयोजित महिला युवा राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हिनाने ४८ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

हिना सध्या जी.एम.बी. ज्युनियर कॉलेज, अर्जुनी मोर येथे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच पॉवरलिफ्टिंगचा सराव सातत्याने सुरू ठेवत आहे. रेड डायमंड फिटनेस क्लब, अर्जुनी मोर येथील प्रशिक्षक आकाश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी कठोर प्रशिक्षण घेतले.

राष्ट्रीय स्पर्धेत हिनाने स्क्वॉटमध्ये ५५ किलो, बेंच प्रेसमध्ये ३० किलो, तर डेडलिफ्टमध्ये तब्बल ९० किलो वजन उचलले. या तीनही प्रकारांत मिळून तिने एकूण १७५ किलो वजन उचलत आपली ताकद, जिद्द आणि कौशल्य सिद्ध केले. अवघ्या ४८ किलो वजन गटातील खेळाडूने १७५ किलो वजन उचलण्याची केलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.

हिनाच्या या राष्ट्रीय यशामुळे केशोरीसह अर्जुनी मोर तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुटुंबीय, कोहळी समाज, जी.एम.बी. ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक, मित्रपरिवार, प्रशिक्षक तसेच केशोरी व अर्जुनी मोर परिसरातील क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीतून मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या हिनाचे हे यश परिसरातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे. भविष्यात हिना आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करून आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Popular Articles