– लाखनी सिंधी लाईन चौकातील कारवाईने परिसरात खळबळ; आरोपीचा मोबाईल जप्त, घरझडती सुरू
हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी जमा केलेली मूळ कागदपत्रे परत करण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाखनी येथील ‘नेहा सेतू केंद्र’ संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. सतीश तुळशीराम मोटघरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे नोंदणीकृत कामगार आहेत. त्यांनी सन २०२१ मध्ये आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी लाखनी येथील सिंधी लाईन चौकातील ‘नेहा सेतू केंद्रा’तून ऑनलाइन अर्ज भरला होता. यावेळी केंद्र चालक सतीश मोटघरे याने तक्रारदाराची १० वीची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड आणि मूळ कामगार कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती.
शिष्यवृत्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार आपली मूळ कागदपत्रे परत मागण्यासाठी वारंवार चकरा मारत होते. मात्र, मोटघरे याने काहीतरी कारण सांगून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. शेवटी ३० जानेवारी २०२६ रोजी कागदपत्रे परत करण्यासाठी मोटघरे याने स्वतःसाठी आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावावर १२,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याप्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी भंडारा ACB कडे तक्रार केली. पडताळणी दरम्यान, तडजोडीअंती ११,००० रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. त्यानुसार, १० फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहा सेतू केंद्रावर सापळा रचला. तक्रारदाराकडून ११,००० रुपये स्वीकारताना सतीश मोटघरे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपीकडून लाचेची रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाखनी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा ACB चे पोलीस उपधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, उज्वला मडावी आणि त्यांच्या पथकाने केली.




