spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ड्रॅगन पॅलेसच्या विस्तारावर टाच? न्यायालयीन इमारतीच्या प्रस्तावामुळे कामठीत संतापाची लाट

– बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे नगर सेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

कामठी :- जागतिक वारसा आणि बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ च्या अस्तित्वावर आणि विस्तारावर गदा आणणारा एक नवा प्रस्ताव समोर आल्याने खळबळ माजली आहे. खसरा क्र. ३६/८ मधील २२,८०० चौ. मि. जागेवर प्रस्तावित न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासाचे बांधकाम करण्याचा घाट घातला जात असून, याला बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे नगर सेवकांनी तसेच पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध दर्शवला आहे.

कामठी येथील नगर परिषदेच्या दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ०५ अंतर्गत ड्रॅगन पॅलेसच्या हक्काच्या जागेवर न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही जागा मुळात ड्रॅगन पॅलेसच्या जागतिक दर्जाच्या विस्तारीकरणासाठी, भाविकांच्या निवासासाठी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

जागतिक धार्मिक महत्त्व: ड्रॅगन पॅलेस हे केवळ एक वास्तू नसून शासनाने ‘ब’ श्रेणीचा पर्यटन दर्जा दिलेली जागतिक वास्तू आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे ७ ते ८ लाख अनुयायी दर्शनासाठी येतात.

सरकारच्या आश्वासनाला हरताळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिसराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्याच जागेवर अन्य बांधकाम प्रस्तावित करून सरकारने भाविकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पर्यायी व्यवस्था आधीच उपलब्ध: ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्गालगत सर्व सोयींनी युक्त अशी भव्य न्यायालयीन इमारत आधीच उभारण्यात आली आहे. असे असताना पुन्हा ड्रॅगन पॅलेस टेंपल शेजारीच न्यायालयाचा घाट घालणे अनाकलनीय आहे.

जनभावनेचा उद्रेक: हा प्रस्ताव बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावणारा असून, यामुळे शहरात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुजन रिपब्लिकन एकता मंच ची स्पष्ट भूमिका:

“प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि आजच्या सभेतील विषय क्र. ०५ तातडीने रद्द करावा. ही जागा केवळ आणि केवळ ड्रॅगन पॅलेसच्या विस्तारासाठी आणि बौद्ध धर्मीयांच्या सोयीसाठीच आरक्षित राहावी, अन्यथा आम्हाला तीव्र पाऊल उचलावे लागेल,” असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे नगरसेवक आकाश भोकरे, नगरसेवक नियाज कुरेशी, पदाधिकारी उदास बनसोड, सुभाष सोमकुवर, अंकुश बोंबार्डे, दीपांकर गणवीर, विलास बनसोड, सागर भावे, सुनील वानखेडे, नरेश बावनकुडे, शालिकराम आधकने आणि राजेश शंभरकर, अशोक नगरकर, अविनाश वासे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

Popular Articles