spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहाडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई

– टिप्परसह 20 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत टिप्परसह एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मौजा रोहा शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली असून अवैध उत्खनन आणि विनापरवाना रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस स्टेशन मोहाडीचे पोलीस निरीक्षक बेलखेडे हे पोलीस पथकासह नियमित पेट्रोलिंग करीत असताना रोहा शिवारातील रोहणा पांदण रस्त्यावर संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी आरोपी अमोल जीवन तिजारे (वय 31, रा. रोहा) हा क्लिनरसह टिप्पर क्रमांक MH 40 BL 1809 मध्ये पांदण रस्त्यालगत साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावरून पिवळ्या रंगाच्या जेसीबीच्या सहाय्याने अंदाजे 5 ब्रास रेती भरत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने टिप्परसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून टिप्पर पकडला. तपासणीअंती अंदाजे 30 हजार रुपये किमतीची 5 ब्रास रेती आणि 20 लाख रुपये किमतीचा टिप्पर असा एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध पास किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 211/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 49, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बेलखेडे, पोलीस हवालदार भुरे तसेच मोहाडी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत असून अवैध रेती तस्करीशी संबंधित इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.

जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून अशा कारवायांमुळे महसूल चोरीसह पर्यावरणीय हानी रोखण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular Articles