हंसराज भंडारा :- भंडारा वनविभागाअंतर्गत साकोली वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र साकोली, नियतक्षेत्र किन्ही अंतर्गत येणारे मौजा विर्शी येथे दि.15 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5.00 वाजेच्या सुमारास मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या वन्यप्राणी बिबट्याने छत्तीसगड राज्यातील बलौदा बाजार जिल्ह्यातील सुहेला येथील रहिवासी असलेले काशीराम मिरी यांची 5 वर्षाची चिमुकली अंशिका कांशीराम मिरी, हिच्यावर अचानक हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत अंशिकाचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मौजा विर्शी व संलग्न गाव परिसरात दहशत माजविणाऱ्या वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार वनविभागामार्फत घटनेच्या दिवसापासून हल्लेखोर बिबट्यास जेरबंद करण्यासाठी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग व सहाय्यक वनसंरक्षक साकोली संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली एस.आर. कटरे यांनी वन्यप्राणी बचाव दल, भंडारा-साकोली तसेच साकोली वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यामार्फत शर्तीचे प्रयत्न सुरु ठेवले होते. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात ट्रॅप कॅमेरे लावुन बिबट्याचे संनियंत्रण नियमित स्वरुपात करण्यात येत होते. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भ्रमणमार्गावर ट्रॅप पिंजरे लावण्यात आले होते.
दिनांक 4 मे 2026 रोजी अखेर हल्लेखोर बिबट्याकरीता लावण्यात आलेल्या एका ट्रॅप पिंजऱ्यामध्ये बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले असून जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
मानव वन्यप्राणी संघर्षाच्या घटना उदभवले असता, स्थानिक नागरिकांनी वनविभागास सहकार्य करावे, तसेच वन्यजीवाचे मानवी अधिवासात अस्तित्व आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ नजिकच्या वनकर्मचाऱ्यास किंवा हॅलो फॉरेस्ट हेल्प लाईन क्रमांक 1926 किंवा वनविभाग भंडाराचे संनियंत्रण कक्ष हेल्प लाईन क्रमांक 07184-252283 यावर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.