– नर्सिंग होमची मान्यता रद्द, सोनोग्राफी सेंटर सील; भंडारा पोलिसांची मोठी कारवाई
हंसराज,भंडारा/गोंदिया :- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्यासह एकूण १० जणांविरुद्ध भंडारा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. यासोबतच प्रशासनाने कठोर पाऊल उचलत आरोपी डॉक्टरच्या ‘न्यू बालाजी नर्सिंग होम’ची मान्यता रद्द केली असून त्याचे सोनोग्राफी सेंटरही सील केले आहे.
गोंदिया येथील न्यू बालाजी नर्सिंग होमचा संचालक डॉ. नितेश बाजपेयी हा उपचारासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत होता. या महिलांच्या नवजात बाळांची ३ ते ४ लाख रुपयांत विक्री करण्याचा गोरखधंदा त्याने मांडला होता. या प्रकरणाची पहिली तक्रार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी पोलिस ठाण्यात जानेवारी महिन्यात दाखल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी एका बाळाची सुटका केली होती.
एसआयटीकडून (SIT) सखोल तपास प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) गठीत केले होते. तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपीने डिसेंबर २०२३ मध्ये देखील एका बाळाची विक्री केली होती. पोलिसांनी त्या बाळाचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
डॉक्टरचा आत्महत्येचा बनाव फसला अटकेच्या भीतीने डॉ. बाजपेयी याने स्वतःला जखमी करून आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र, भंडारा पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे त्याचे हे कारस्थान उधळून लावले आणि त्याला अटक केली. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर १० जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रशासकीय हातोडा भंडारा पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर गोंदियाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी डॉ. बाजपेयीच्या ‘न्यू बालाजी नर्सिंग होम’ची मान्यता रद्द केली आहे. तसेच, ४ मे रोजी त्याचे सोनोग्राफी सेंटर प्रशासनाकडून सील करण्यात आले.
वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने, निष्पाप बाळांच्या जिवाशी खेळणाऱ्या या टोळीला कठोर कायदेशीर धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.