– पावसाळ्यात पाणी साचू न देण्याचे निर्देश
नागपूर :- पावसाळ्यात शहरातील सखल भागात आणि रेल्वे परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नागपूर मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) श्री. विनायक गर्ग आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी गुरुवारी (ता. २१ मे) संयुक्त दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शक्ती नाला तसेच रेल्वे रुळांखालातून (पटरीखालून) वाहणाऱ्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे कार्यालय, मुख्य रेल्वे स्थानक आणि नई बस्ती येथील नाल्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात हे नाले ओसंडून वाहिल्यामुळे आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रेल्वे कार्यालय आणि स्टेशन परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांची ही गैरसोय होते. या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.![]()
रेल्वे रुळांच्या खालून वाहणाऱ्या नाल्यांची संपूर्ण स्वच्छता रेल्वे प्रशासनातर्फे केली जाईल. या कामासाठी आवश्यक असणारी सर्व मशिनरी रेल्वे पुरवणार असून, मनपा प्रशासन या कामात पूर्ण सहकार्य करेल. तसेच शक्ती नाल्याची साफसफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. मोतीबाग, सदिच्छा कॉलनी, संत्रा मार्केट आणि परिसरातील नागरिकांनी या नाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार मनपाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर हा संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात स्थानिक नगरसेवक विवेक निकोसे, मनपा उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता सुनील उईके, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह दोन्ही विभागांचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.