spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत 12 जून रोजी

कामठी :- आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी 12 जून रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार गणेश जगदाडे यांनी जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार गावातील पात्र मतदार, इच्छुक उमेदवार व नागरिकांनी या ग्रामसभांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 12 जून रोजी सकाळी 11 वाजता लोंणखैरी, टेमसना, भामेवाडा, महालगाव, केसोरी, पावनगाव, घोरपड आणि कोराडी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता पांजरा व खेडी या दोन गावांमध्ये विशेष ग्रामसभा होणार आहे.

या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) तसेच महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित प्रभागांमधील आरक्षणाची अंतिम निश्चिती सोडतीद्वारे केली जाणार आहे.

आरक्षणातील संभाव्य बदलांमुळे गावागावांतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार, राजकीय गट आणि स्थानिक संघटनांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले असून अनेक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या आरक्षण प्रक्रियेमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली असून 12 जून रोजी होणाऱ्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.