spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने पकडले दोन ट्रॅक्टर; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा पवनी :- जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली  असून ४ जुलै २०२६ रोजी पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आसगाव शिवारात दोन ट्रॅक्टर पकडून एकूण १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंदरी ते आसगाव जाणाऱ्या मार्गावर अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून कारवाई केली. पहिल्या कारवाईत आकाश रवींद्र सिंधी मेश्राम (२०), राहणार शिवनाळा, याला विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले. त्याच्या  ताब्यातून अंदाजे १ ब्रास वाळू, विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्याच परिसरात केलेल्या दुसऱ्या कारवाईत प्रशांत तेजराम डोये (३४), राहणार आसगाव, याला अवैध वाळू वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ ब्रास वाळू, निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि विना क्रमांकाची ट्रॉली असा ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भातही गुन्हा क्रमांक ३९१/२०२६ नुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार मन्नाडे व पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.