spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोरवाल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा हीरक महोत्सवी ‘अलुमनी मैत्री मेळावा’ उत्साहात संपन्न

– बिमल घोष व विजय शर्मा यांच्या उपस्थितीत स्मरणिकेचे प्रकाशन; माजी विद्यार्थ्यांसह गुणवंतांचा ‘अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरव

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. ११ जुलै) कलमना रोडवरील साबले सेलिब्रेशन लॉन येथे भव्य ‘अलुमनी मैत्री मेळावा’ आयोजित करण्यात आला. ‘डॉक्टर्स डे’ला समर्पित असलेल्या या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अलुमनी मैत्री मेळावा’ स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व राष्ट्रीय फुटबॉलपटू बिमल घोष, एपीएमसी मुंबईचे उपसभापती हुकुमचंद आमधरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे, नंदी क्लिनिकचे संचालक व बंगाली वेल्फेअर अँड कल्चरल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. बी. एन. नंदी, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. निशात शेख, पोरवाल महाविद्यालयाचे सचिव विजय शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर धौंगडे व प्राचार्य डॉ. स्वप्नील दाहात उपस्थित होते. यावेळी उद्योगपती सुनील अग्रवाल, नागोराव साबळे, शिवसेना जिल्हा संघटक राधेश्याम हटवार तसेच समाजसेविका आशा आनंद यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी पोरवाल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुष्पगुच्छ, स्मरणिका व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अनिल मंगतानी, डॉ. महेश महाजन आणि डॉ. प्रवीण नितनवरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष महेंद्र भुटानी, दिनेश स्वामी, पीएसआय अजय गर्जे, घोरपडच्या सरपंच तारा कडू आणि कन्हान नगरपंचायतीचे उपाध्यक्ष रिंकेश चौरे यांचाही सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही ‘अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात आयोजित सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. परितोष मुखर्जी, अभिजित बॅनर्जी, पूर्णिमा बॅनर्जी, प्रवीण बनकर, अलका लाडे, डॉ. अनिल मंगतानी, आशा आनंद, प्रदीप ठाकरे आणि जायद अली पटेल यांनी सादर केलेल्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांनी वातावरण रंगतदार केले. उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सहभागी प्रत्येक सदस्याला स्मरणिका व आकर्षक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

हा हीरक महोत्सवी मेळावा यशस्वी करण्यासाठी पोरवाल कॉलेज एक्स-स्टुडंट्स असोसिएशनच्या कोअर टीमने विशेष परिश्रम घेतले. संयोजक सौमित्र कल्याणी, बैकुंठनाथ नंदी (उपसंपादक), अध्यक्षा माया चवरे, उपाध्यक्ष नरेश दावानी, उदयसिंग यादव, उपसंयोजक रितेश यादव, परितोष मुखर्जी तसेच कोअर समितीतील सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन करून हा सोहळा संस्मरणीय ठरविला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.