spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घनकचरा व्यवस्थापन नियमांची कामठीत कडक अंमलबजावणी; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार – मुख्याधिकारी विनोद जाधव

कामठी :- केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरणातील बदल विभागाच्या दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी अधिसूचित केलेले घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 हे दिनांक 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशात लागू झाले असून जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कामठी शहराच्या निर्मितीसाठी कामठी नगर परिषदेकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ अन्वये सर्व नागरिक, व्यापारी,औद्योगिक व व्यवसायिक आस्थापना , शासकीय व खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल,मंगल कार्यालये, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था,मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे घटक तसेच सर्व व्यावसायिक आस्थापनांनी कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक अशा चार प्रकारांत स्रोतावरच वर्गीकरण करणे आता बंधनकारक राहणार आहे.

नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, घराघरातून निर्माण होणारा कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, ओला व सुका कचरा एकत्र मिसळणे, प्लास्टिक व ई-कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणे तसेच सॅनिटरी कचरा उघड्यावर फेकणे यासारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात येणार असून अशा नियमभंग करणाऱ्यांवर ‘पोल्युटर पेज प्रिन्सिपल’ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, शाळा, हॉटेल्स, बाजारपेठा व इतर आस्थापनांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायोगॅस प्रक्रिया करणे, तसेच उर्वरित कचरा अधिकृत यंत्रणेकडेच सुपूर्द करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

यासोबतच नगर परिषदेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांना कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “माझा कचरा-माझी जवाबदारी””

स्वच्छ कामठी, हरित कामठी आणि प्रदूषणमुक्त शहर उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घनकचरा व्यवस्थापन नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन कामठी नगर परिषदचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी कामठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.