spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरसेवकांनाही मिळावा हक्काचा विकास निधी; नगरसेविका दिव्या गायधने यांची शासनाकडे ठोस मागणी

कामठी :-  स्थानिक स्वराज्य संस्थांचा कणा मानल्या जाणाऱ्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक अधिकार मिळणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत, नगर परिषदेतील प्रत्येक नगरसेवकाला आमदार स्थानिक विकास निधीच्या धर्तीवर स्वतंत्र वार्षिक विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका. दिव्या कपिल गायधने यांनी विधान परिषद आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

३१ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नगरसेवकांकडे स्वतंत्र विकास निधी नसल्यामुळे प्रभागातील रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, समाजमंदिरे, उद्याने, स्ट्रीट लाईट आदी विकासकामांसाठी त्यांना विविध योजनांवर आणि इतर निधींवर अवलंबून राहावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी अनेक अत्यावश्यक कामे प्रलंबित राहतात आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अडथळे निर्माण होतात.नगरसेविका . दिव्या कपिल गायधने यांनी आपल्या निवेदनात शासनाने नगरसेवकांसाठी “स्वतंत्र वार्षिक नगरसेवक विकास निधी” ही योजना सुरू करावी, तसेच या महत्त्वपूर्ण विषयावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधावे, अशी विनंती आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे केली आहे.

नगरसेवकांना थेट विकास निधी उपलब्ध झाल्यास प्रत्येक प्रभागात लोकाभिमुख विकासकामांना गती मिळेल, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, स्थानिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करता येतील आणि नागरिकांना विकासाचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण होऊन लोकप्रतिनिधींना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नगरसेविका दिव्या गायधने यांनी मांडलेल्या या मागणीमुळे राज्यातील सर्व नगर परिषदांतील नगरसेवकांच्या अधिकारांबाबत आणि स्थानिक विकासासाठी स्वतंत्र निधीच्या संकल्पनेबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शासन या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणार का, याकडे राज्यभरातील नगरसेवक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles