spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

– स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना आणि जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

हंसराज, भंडारा :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ‘ऑगस्ट क्रांती दिन’ आणि ‘जागतिक आदिवासी दिन’ यांचे औचित्य साधून, ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील छोटा बाजार येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरून ‘चले जाव’चा नारा देत ‘करो या मरो’ची हाक दिली होती. या आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली आणि ब्रिटीश सत्तेला हादरवून सोडले. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.

यासोबतच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जल-जंगल-जमिनीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महापुरुषांचा त्याग पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, प्राध्यापक राजपूत, दिलीप उमाळे, संजय खंडाईत, संजय वाघमारे, अमित मेहर, सुरेंद्र मोटघरे, नामदेव धकाते, मनीषा भांडारकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.

Popular Articles