spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधून बुद्धविचारांच्या जागतिक प्रसाराला नवी दिशा!

– जपानी उद्योजक सुझुकी यासुमी यांची कामठीतील धम्मभूमीला सदिच्छा भेट

– भारत-जपान सहकार्याचा नवा अध्याय

कामठी :- तथागत भगवान बुद्धांचा अहिंसा, शांती, करुणा आणि मानवतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या अभियानाला कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून आणखी व्यापक बळ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जपानच्या सुझुयासु ग्लोबल नेटवर्किंग सर्व्हिसेस प्रा. लि.चे माजी महाव्यवस्थापक तथा प्रसिद्ध बिझनेस कन्सल्टंट सुझुकी यासुमी यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट देत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला वंदन केले.

या वेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मुख्य संरक्षक ॲड. सुलेखा कुंभारे यांनी भारतीय परंपरेनुसार पुष्पगुच्छ देऊन सुझुकी यासुमी यांचे आत्मीय स्वागत केले. या भेटीमुळे भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक व बौद्ध धम्माच्या विचारांचे नाते अधिक दृढ होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

बुद्धविचारांच्या जागतिक प्रसारासाठी संयुक्त उपक्रम

ॲड. सुलेखा कुंभारे आणि सुझुकी यासुमी यांच्यात झालेल्या बैठकीत बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम, आंतरराष्ट्रीय परिसंवाद, चर्चासत्रे तसेच औद्योगिक व विकासात्मक उपक्रम संयुक्तपणे राबविण्याबाबत सखोल चर्चा झाली.

जगात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांचा शांती आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘या पवित्र भूमीने मनाला अपार शांती दिली’

आपल्या भेटीबद्दल भावना व्यक्त करताना सुझुकी यासुमी यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. “कदाचित भगवान बुद्धांच्या प्रेरणेमुळेच आणि अनेक योगायोगांमुळे मला या पवित्र भूमीत येण्याची संधी मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि मनःशांती देणारा आहे. भगवान बुद्धांनीच मला येथे आणले, अशी माझी भावना आहे,” असे त्यांनी सांगितले.

ॲड. सुलेखा कुंभारे यांनी दिलेल्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या धम्मकार्याचे कौतुक केले. “बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी ॲड. सुलेखा कुंभारे करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. या पवित्र वास्तूला पुन्हा भेट देण्याची माझी नक्कीच इच्छा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल केवळ भारताचे नव्हे, तर जगाचे केंद्र’

सुझुकी यासुमी म्हणाले की, “ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे केवळ भारताचे श्रद्धास्थान नसून, संपूर्ण जगाला भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती आणि सत्याचा संदेश देणारे प्रेरणास्थान आहे. ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमांतून जपानसह जगभर बुद्धविचारांचा प्रसार होत आहे. अशा पावन भूमीवर येऊन नतमस्तक होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे.”

कामठीतून जगभर पोहोचतोय शांततेचा संदेश

जपानमधील प्रसिद्ध व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाची ही सदिच्छा भेट ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आंतरराष्ट्रीय कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्धविचार, शांतता आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचविणाऱ्या महत्त्वपूर्ण केंद्राच्या रूपात अधिक सक्षम होत असल्याचे या भेटीने अधोरेखित झाले आहे.

या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे भारत-जपान मैत्री, बौद्ध धम्माचा जागतिक प्रसार आणि मानवतावादी विचारांच्या देवाणघेवाणीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, परिसरातील बौद्ध बांधव आणि नागरिकांकडून या भेटीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.