spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यातील अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला जामीन मिळाल्याची निव्वळ अफवा; पोलीस प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन

हंसराज,भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड भागात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे शहर हादरले आहे. या घटनेतील नराधम आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर करून त्याची सुटका केली आहे, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, ही निव्वळ एक अफवा असून नागरिकांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण भंडारा जिल्हा पोलिसांनी दिले आहे.

आरोपी अद्याप रुग्णालयातच भंडारा पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, संबंधित गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलीस कोठडीत असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. हॉस्पिटलमध्ये आरोपीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, त्याला कोणताही जामीन मिळालेला नाही. रुग्णालयातून सुट्टी मिळताच त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन अत्यंत दक्षतेने पावले उचलत आहे. या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत.

अफवांना बळी पडू नका: पोलिसांचे आवाहन सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे शहरात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भंडारा शहरातील सुज्ञ नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन भंडारा जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Popular Articles