spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भुयार-मेंढेगाव मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारकांचा जीव टांगणीला!

– १५ लाखांच्या निधीचा चुराडा; एखाद्याचा बळी गेल्यावरच बांधकाम विभाग जागी होणार का? नागरिकांचा संतप्त सवाल

भंडारा, पवनी :- पवनी तालुक्यातील भुयार ते मेंढेगाव या मुख्य मार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली असून, अवघ्या ३ किलोमीटरच्या या रस्त्याने जणू ‘मृत्यूचे रूप’ धारण केले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवघ्या चार महिन्यांत कामाचे पितळ उघडे विशेष म्हणजे, अवघ्या ८ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडून या रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून डांबराचे पेजेस (Patchwork) करण्यात आले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने कामात हलगर्जीपणा करत मुरूम, चुरी आणि निकृष्ट दर्जाचे डांबर वापरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. परिणामी, अवघ्या चार महिन्यांतच मुरूम आणि खडी रस्त्याबाहेर पडली असून डांबराचा मागमूसही उरलेला नाही. शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा असा चुराडा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपघातांचे सत्र; शालेय विद्यार्थी धोक्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नाही, परिणामी दररोज दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. अनेकजण रक्तबंबाळ झाले आहेत. रोज शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शेतमाल बाजारात नेण्यासाठी आणि आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी या रस्त्यावरून जाणे म्हणजे एक मोठी कसरत ठरत आहे.

प्रशासनाला बळीची प्रतीक्षा आहे का? रस्त्याच्या या भीषण अवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. “प्रशासनाला जाग येण्यासाठी येथे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची प्रतीक्षा केली जात आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भुयार व मेंढेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.