– कोहमारा व नवेगावबांध टी-पॉइंट येथील चोरीचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे
गोंदिया :- कोहमारा पोलीस ठाणे हद्दीतील हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक ७ ते ८ ऑगस्टदरम्यान कोहमारा येथील मोटार पंप विक्री व रिवायंडिंग दुकानाचे कुलूप तोडून सुमारे १०० किलो तांब्याच्या तारा व रोख रक्कम असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अविनाश विजय राघाते (वय २९, रा. अर्जुनी पुनर्वसन, गिरेगाव, ता. जि. भंडारा) याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या चौकशीतून कोहमारा येथील हार्डवेअर दुकानातून तांब्याच्या तारांचे बंडल तसेच नवेगावबांध टी-पॉइंट येथील संजय हार्डवेअर दुकानातून १४ ते १५ जूनदरम्यान तांबे-धातूच्या तारांचे बंडल चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून २१० किलो तांबे-धातूच्या तारांची किंमत १ लाख १६ हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन पिकअप वाहने अंदाजे ५ लाख रुपये, असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून चोरीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, पोहवा तुलसीदास लुटे, पोहवा दुर्गेश तिवारी, पोहवा प्रकाश गायकधने, पो.शि. सुनील डहाके, पो.शि. राकेश इंद्रकर, चापोशि विलास ठाकरे, पोलीस निरीक्षक जगदीश सोनटक्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले पाऊल प्रभावी ठरले आहे.





