spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तामसवाडी, रेंगापार, परसवाडा मार्गावर एसटी बस सुरू करा; अन्यथा १९ तारखेला ‘रस्ता रोको’

– पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांचा इशारा; आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन

 हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील तामसवाडी, रेंगापार आणि परसवाडा ही गावे मागील अनेक वर्षांपासून हक्काच्या एसटी बस सेवेपासून वंचित आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सर्वसामान्य जनतेलाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या १९ ऑगस्ट रोजी हरदोली (सि) येथील राज्य मार्गावर तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल विठोबा नागपुरे यांनी दिला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तुमसर आगार व्यवस्थापकांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, तामसवाडी, रेंगापार, परसवाडा या भागातील मुले शिक्षणासाठी तुमसर येथील शाळा-कॉलेजमध्ये येतात. बस नसल्याने त्यांना पायपीट करावी लागते किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. याबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेतही चर्चा झाली होती. त्यावेळी आगार व्यवस्थापनाने तात्काळ बस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन महिने उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर येत्या ८ दिवसात तुमसर-रेंगापार-परसवाडा ही बस सेवा सुरू झाली नाही, तर १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने हरदोली (सि) येथे रस्ता रोको आंदोलन केले जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला एसटी प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य राजू ढबाले, अनिल वासनिक, रवी शिंदे, परमानंद भांडारकर, पिंटू आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Popular Articles