spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिलांच्या आनंदाला नवी उभारी

– मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे महिलांसाठी प्रथमच आयोजन

– मनपातर्फे ‘महापौर श्रावण उत्सव सोहळा’ उत्साहात साजरा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांना त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी आनंदाने जगता यावेत, मैत्रिणींसोबत हसता-खेळता यावे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने ‘महापौर श्रावण उत्सव सोहळा’ बजेरिया येथील वंदे मातरम् उद्यान उत्साहात पार पडला. महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे मनपाच्या क्रीड व सांस्कृतिक विभागाद्वारे पहिल्यांदाच महिलांसाठी अशा प्रकारच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, अग्निशमन आणि विद्युत सभापती रुपाली ठाकूर, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, नगरसेविका वैशाली उदापूरकर, सारिका नांदुरकर,  कल्पना शर्मा, रेखा निमजे, दिव्य धुरडे, प्रमिला गौर, ममता ठाकूर, क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे, कार्यकारी अभियंता सविता गणोरकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महापौर निता ठाकरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, श्रावण उत्सव केवळ पूजा-अर्चना किंवा उपवासापुरता मर्यादित नसून, तो स्त्रीशक्ती, तिचे कर्तृत्व आणि तिच्या आनंदाचा उत्सव आहे. वर्षभर घर, मुलं आणि कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा आणि त्या मनमोकळेपणाने या उत्सवाचा आनंद घेऊ शकाव्यात, यासाठी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागपूर महानगरपालिकेद्वारा सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांची सुरुवात होते. त्यामुळे महिलांसाठी काहीतरी वेगळे आणि आनंददायी आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांनी “श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे” या गीताच्या ओळी म्हणत महिलांचा उत्साह वाढविला. या कार्यक्रमामुळे महिलांना नवी ऊर्जा आणि आनंद मिळावा, हाच या आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड म्हणाल्या की, महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, महिलांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद घ्यावा. नागपूर शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी काळातही महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

विविध स्पर्धांनी रंगली श्रावणाची रंगत

कार्यक्रमात श्रावण क्वीन, फुल राणी, तुझी माझी जोडी आणि ‘रंग माझा हिरवा’अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच श्रावण गीते, नृत्य, गेम्स, फॅशन शो आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी मिस परफेक्ट’ आणि ‘बेस्ट हेअरस्टाइल’ हा पुरस्कार निहारिका चौहान यांना, ‘रंग माझा हिरवा’ पुरस्कार शकुंतला सोनी यांना,श्रावण क्वीन’ हा पुरस्कार  मीना राजपुरोहित यांना, तर ‘फुल राणी’ स्पर्धेचा पुरस्कार सोनल नवलाखे यांना मिळाला. बलून स्पर्धेत पूनम मोहबे आणि नृत्य स्पर्धेत शेफाली लोखंडे यांनी बाजी मारली. यावेळी सर्व विजेत्या महिलांना “पैठणी साडी व डिनर सेट” देऊन गौरविण्यात आले.

Popular Articles