spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आझादनगरातील १५ ठिकाणी सौर पथदिव्यांची सुविधा

– नागरिकांच्या मागणीची नगराध्यक्ष अजय अग्रवालांकडून दखल; नगरसेवक आकाश भोकरे यांच्याकडून आभार

कामठी :- प्रभाग क्रमांक १७ (ब) मधील आझादनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत विविध १५ ठिकाणी सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अंधाराच्या समस्येवर उपाय होऊन परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित व प्रकाशमय वातावरण उपलब्ध होणार आहे.

आझादनगर परिसरातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांनी सौर पथदिवे बसविण्याची मागणी केली होती.

नागरिकांच्या मागणीची तत्परतेने दखल घेत नगराध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांच्या माध्यमातून १५ ठिकाणी सौर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली. सौरऊर्जेवर आधारित या दिव्यांमुळे परिसरातील प्रकाशव्यवस्था सक्षम होण्यासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापरही वाढणार आहे.

दरम्यान, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी निगडित मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्ष कार्यवाही केल्याबद्दल प्रभाग क्रमांक १७ (ब) चे नगरसेवक आकाश प्रदीप भोकरे यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“नागरिकांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी असून, प्रभागातील उर्वरित आवश्यक ठिकाणीही प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील,” असे नगरसेवक आकाश भोकरे यांनी सांगितले.

सौर पथदिव्यांच्या सुविधेमुळे आझादनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या कामाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Popular Articles