खापा, वार्ताहर :- ग्रामीण भागात बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार करून विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने खापा येथे आयोजित ‘स्व. किशनराव चव्हाण व स्व. कौसल्याबाई चव्हाण स्मृती द्वितीय खापा खुली एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ८० वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंत एकूण ९७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.
चेस असोसिएशन नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिलियंट चेस अकॅडमी आणि पॉवर चेस अकॅडमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी तान्या सेलिब्रेशन लॉन, खापा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपूर, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, रामटेक, गोंदिया, तुमसर यांसह विविध शहरांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, त्यांच्यात खेळाविषयी आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातून गुणवंत बुद्धिबळपटू घडावेत, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक निलेश चन्नावार आणि दीपक चव्हाण यांनी सांगितले.

स्पर्धेत एकूण आठ फेऱ्या खेळविण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमांनुसार पार पडलेल्या या स्पर्धेसाठी ५० बुद्धिबळ पटांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक डावासाठी १० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी पाच सेकंदांची वाढीव वेळ देण्यात आली. नागपूर येथील राष्ट्रीय पंच आकाश रेवतकर यांनी मुख्य पंच म्हणून, तर नागपूर येथील राष्ट्रीय पंच गायत्री पाणबुडे, शिशिर इंदुरकर आणि शेगाव येथील अनंता सिरस्कार यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले. राज्यस्तरीय विजेता १३ वर्षांखालील गटातील बुद्धिबळपटू सहजवीर सिंग मरास यानेही स्पर्धेत सहभाग घेतला.
“प्रमुख विजेते”
खुल्या गटात आंतरराष्ट्रीय पंच व बुद्धिबळपटू शिवा अय्यर यांनी प्रथम क्रमांक पटकावून सहा हजार रुपये रोख, चषक व पदक मिळविले. विश्वादित्य अवस्थी यांनी द्वितीय क्रमांकासह तीन हजार रुपये, पलाश नागदेवते यांनी तृतीय क्रमांकासह दोन हजार रुपये, तर अमोल रामटेके यांनी चतुर्थ क्रमांकासह एक हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. याज्ञेश दरेकर यांनी पाचवा क्रमांक मिळवून ९०० रुपयांचे पारितोषिक, चषक, पदक प्राप्त केले.
सर्वोत्तम व्हर्टन पुरुष गटात गौतम मेश्राम, शैलेंद्र पाटील, प्रभाकर पाटील व समीर मोरोनय यांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक मिळविले. सर्वोत्तम व्हर्टन महिला गटात सृष्टी ताकसांडे, सान्वी मेश्राम, इशिका चौबे, राची फुलझेले आणि मनस्वी यादव यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले.
“विविध वयोगटातील विजेते”
सात वर्षांखालील मुलांच्या गटात नक्ष इंदाने, लोकेश गौर व आद्विक सुखदेवे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. मुलींच्या गटात मायशा रेवतकर प्रथम, तर श्राव्या मेश्राम द्वितीय आली.
नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात स्वरा दलाल, सेजल टेकाडे व शाश्वत इंदूरकर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. मुलांच्या गटात कीर्ती साई, वेदांत चितळे व मानद कारंगमी यांनी यश संपादन केले.
अकरा वर्षांखालील मुलींच्या गटात मनस्वी सावरकर प्रथम व मनस्वी भोंडे द्वितीय आली. मुलांच्या गटात विवान मालू प्रथम, ओम नेमाडे द्वितीय आणि अंकुश पाटील तृतीय ठरले.
तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात अननी अग्रवाल व शिप्रा लोकरे यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळविले. मुलांच्या गटात शिवम शाह प्रथम, विनय गजभिये द्वितीय आणि कार्तिक सावल तृतीय आला.
पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व चौबे प्रथम, जीत जैन द्वितीय आणि उत्कर्ष कोठारे तृतीय ठरले. मानस ठाकरे हा स्पर्धेतील सर्वांत लहान खेळाडू ठरला.
“खेळाडूंचा गौरव”
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांच्या वतीने रोख बक्षिस, ६० चषक, ८० पदके आणि १४ प्रमुख स्पर्धकांना चेस नोटेशन पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. सहभागी खेळाडूंसाठी आयोजकांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी वासुदेव रंधाई, यशपाल यादवार, संजय श्रीरामे, हेमंत बिजेवार, धर्मेंद्र दियेवार, आशिष दियेवार आणि अमित गोदेवार यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धेचे आयोजक व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक निलेश चन्नावार आणि आंतरराष्ट्रीय पंच दीपक चव्हाण यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. संचालन व आभार प्रदर्शन दीपक चव्हाण यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभाला पत्रकार मकसूद शेख, सुरेश चव्हाण, रेखा चव्हाण, भैय्याजी दियेवार, सागर सेरेवार, आकाश सेरेवार, काशिंद्रनाथ पिपरेवार, इब्राहिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे खापा परिसरात बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळाले असून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.








