नागपूर :- लाल बावटा वाहतूक कामगार युनियन, आपली बस युनिट, सीटू नागपूर (महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वाखाली आपली बसच्या वाहकांच्या वेतनातून कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच योग्य हिशेब न देता करण्यात येत असलेल्या कपातीच्या निषेधार्थ आज मोरभवन-२ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकारामुळे वाहकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली.
युनिटी सिक्युरिटी फोर्सच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी वाहकांना बोनस देताना चुकून जास्त रक्कम देण्यात आली होती. मात्र, या कथित अतिरिक्त रकमेच्या वसुलीसाठी युनिटी सिक्युरिटी फोर्सकडून गेल्या अनेक महिन्यांपासून वाहकांच्या वेतनातून मनमानी पद्धतीने कपात केली जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित वाहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कपातीचा सविस्तर हिशेब न देता ही कारवाई सुरू असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. या अन्यायकारक वेतनकपातीविरोधात युनियनने पत्राद्वारे परिवहन सभापती मंगला खेकरे तसेच चलो मोबिलिटी प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, नागपूर महानगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता हात झटकले, असा आरोप युनियनने केला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अखेर आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे युनियनने स्पष्ट केले. वेतनातून करण्यात येणाऱ्या कपातीबाबत पारदर्शकता ठेवावी, संबंधित वाहकांना योग्य हिशेब द्यावा आणि या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
वाहकांच्या वेतनकपातीच्या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून योग्य तोडगा काढावा. अन्यथा, आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लाल बावटा वाहतूक कामगार युनियनने दिला. या धरणे आंदोलनाच्या यशस्वितेसाठी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गुरुप्रीत सिंह, सचिव कॉम्रेड अनिस सिरकिया, उपाध्यक्ष कॉम्रेड प्रवीण देवराव रंगारी, कोषाध्यक्ष कॉम्रेड योगेश रणदिवे यांच्यासह संतोष भाऊ रायकवार, सुनील माकडे, पुष्पा सोनबावने, चंद्रगुप्त पाणतावने, शंकर ढोके, सचिन मुळे, चहांदे, युवराज बागडे, रितेश रामटेके, शकील भाई, सोपेश्वर सलाम आदी सदस्यांनी सहभाग घेतला.








