पुणे :- शहरात ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून, अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटकेची भीती दाखवून, आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने आणि वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून सायबर चोरांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
नाशिक येथील एका बँकेची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. ६ नोव्हेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नाशिक येथील एका बँकेची दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीतील रक्कम ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार आहे, तसेच मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखवली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत आरटीजीएस सुविधेचा वापर करून ३२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. महिलेने चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करीत आहेत.






