बावडा :- नीरा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली असून, पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. नीरा नदीमध्ये तातडीने पाणी सोडून नदीवरील बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाला यापूर्वी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सराटी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
नीरा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देऊन नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवेदनानुसार, इंदापूर तालुक्यातील कुरवली, कळंब, निमसाखर, खोरोची, बोरीटवाडी, निरवांगी, चाकाटी, पिठेवाडी, नीरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लुमेवाडी, गिरवी, गोंदी, ओझरे आणि नरसिंहपूर या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर माळशिरस तालुक्यातील कळंबोळी, पांगर, पळसमंडळ, कदमवाडी, उंबरे, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, आनंदनगर, अकलूज, माळीनगर, सबतगाव, तांबवे, गणेशगाव आणि बिजवडी या गावांमधील नागरिकही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बंधाऱ्यांचे दरवाजे वेळेत न टाकल्याचा आरोप –
चालू पावसाळ्यात नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. मात्र, नदीवरील बंधाऱ्यांचे दरवाजे वेळेत न टाकल्यामुळे पावसाचे पाणी अडवता आले नाही. परिणामी, पावसाळ्यानंतर नदीपात्र कोरडे पडले असून, उपलब्ध पाणीसाठा संपत चालल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतातील पिकांना पाणी देणेही कठीण झाले असून, हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी –
शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करून नीरा नदीत तातडीने पाणी सोडावे आणि इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमधील बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पुणे व सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच इंदापूर व माळशिरस तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनापूर्वी प्रशासन नदीत पाणी सोडण्याबाबत ठोस निर्णय घेणार का, याकडे दोन्ही तालुक्यांतील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






