मुंबई :- विनाकारण आपत्कालीन साखळी ओढण्याच्या (चेन पुलिंग) वाढत्या प्रकारांचा मोठा फटका सोमवारी मध्य रेल्वेच्यालोकल प्रवाशांना बसला. पहाटेपासून दुपारपर्यंत विविध ठिकाणी घडलेल्या सात घटनांमुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली. या घटनांमुळे अनेक लोकल जागीच थांबवाव्या लागल्याने चाकरमान्यांचा मौल्यवान वेळ वाया गेला. १४ मिनिटांत ५ लोकल अडकल्या: सोमवारी सकाळी ५.२७ ते ५.४१ या अवघ्या १४ मिनिटांच्या कालावधीत एलटीटी ते विद्याविहारदरम्यान एकाच घटनेत तब्बल पाच लोकल खोळंबल्या. त्यानंतर सकाळी ९.१८ ते ९.२२ दरम्यान टिटवाळा ते विद्याविहारदरम्यान लोकल थांबली. दुपारच्या सत्रात कल्याण स्थानकात १२.०६, १२.४१ आणि १.१५ अशा तीन वेळा, तर कल्याण ते शहाडदरम्यान दुपारी १२.३४ वाजता साखळी ओढल्याने लोकल वाहतुकीचा पूर्ण फटका बसला.
सँडहर्स्ट रोडजवळ डब्यात धूर दिसल्याने घबराट
सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ दुपारी २.४५ च्या सुमारास एका लोकलच्या डब्यात अचानक धूर दिसल्याने प्रवाशाने तातडीने आपत्कालीन साखळी ओढली. यामुळे लोकल सुमारे सात मिनिटे जागीच उभी होती. धुरामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मागून येणाऱ्या लोकल गाड्यांचा झाला खोळंबा
वारंवार साखळी ओढल्यामुळे संबंधित लोकलमधील प्रवाशांचा खोळंबा झालाच, शिवाय मागून येणाऱ्या लोकल एकामागे एक अडकून पडल्या. विशेषतः कल्याण परिसरात दुपारच्या सुमारास लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे दुपारच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला.






