– आर्थिक संकटामुळे थकले होते कर्जाचे हप्ते; फायनान्स कंपनीने लावलेले सील अखेर हटवले
हंसराज,भंडारा :- कर्जाच्या थकीत हप्त्यांमुळे एका फायनान्स कंपनीने सील केलेल्या घराचा ताबा अखेर तुमसर येथील ठवकर कुटुंबाला परत मिळाला आहे. आमदार परिणय फुके यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित कंपनीविरोधात दाखल करण्यात आलेली पोलिस तक्रार आणि त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेद्वारे घरावरील सील हटविण्यात आले. या निर्णयामुळे कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या विधवा आशा ठवकर आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
तुमसर येथील गांधीनगर परिसरातील रहिवासी राजू लक्ष्मण ठवकर यांनी सन २०२२ मध्ये घरबांधणीसाठी ‘सितारा सेवा गृह ऋण लिमिटेड’ या कंपनीकडून ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, काही काळानंतर त्यांचे निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या पत्नी आशा ठवकर यांना कर्जाचे पुढील हप्ते वेळेत भरणे शक्य झाले नाही.
हप्ते थकल्याचे कारण देत फायनान्स कंपनीने मार्च २०२६ मध्ये न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन थेट ठवकर यांच्या घराला सील ठोकले होते. या गृहकर्जासोबत जीवनविमा संरक्षण घेतलेले असतानाही, कंपनीने विम्याच्या रकमेतून कर्जाची परतफेड करण्याची कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. इतकेच नव्हे, तर यापूर्वी भरलेल्या हप्त्यांच्या पावत्याही कंपनीने दिल्या नसल्याची तक्रार ठवकर कुटुंबाने केली होती.
प्रशासकीय प्रक्रियेनंतर मिळाला हक्काचा निवारा ऐन संकटाच्या काळात हक्काचे छत हिरावले गेल्याने ठवकर कुटुंबाने ही बाब आ. परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. फुके यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. यानंतर कंपनीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढे झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेअंती घरावरील सील काढण्यात आले आणि ठवकर कुटुंबाला पुन्हा आपल्या घरात प्रवेश मिळाला.






