किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र व गट ग्रामपंचायत धर्मापुरी अंतर्गत येत असलेल्या ईजनी येथील सुर नदीच्या काठावर वसलेल्या सुरसंगम सिद्ध आश्रम येथे अधिक मासानिमित्त पुण्यस्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामुळे परिसरात धार्मिक वातावरण आहे.
निसर्गरम्य परिसरातील आश्रमात हनुमान, शिव आदी देव देवतांची मंदिरे आहे. सुर नदीचे निर्मळ सतत वाहणारे पाणी हे मुख्य आकर्षण आहे. नदीच्या स्वच्छ पाण्यामुळे पुण्यस्नानासाठी महिला भाविकांची संख्या वाढली आहे. पहाटेपासूनच स्नानासाठी रांगा लागल्या आहेत. आश्रम प्रमुख श्री संत छोटे बालकदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम व्यवस्थापनाने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि प्रसाद वाटपाची व्यवस्था केली आहे. गोरक्षण हे आश्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे .गोरक्षणामुळे शेण खताच्या वापर करून आश्रमातर्फे सेंद्रिय शेती केली जाते. धार्मिकतेबरोबरच पर्यावरण पूरक जीवनशैलीच्या संदेशही दिला जात आहे.

अधिक मास संपेपर्यंत भाविकांची गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. आश्रमात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. भक्तगण दिवाळू उर्फ लक्ष्मीनारायण नन्होरे (मोरगाव ), भगवान भोयर (श्रीखंडा),भोजराम भिवगडे ( धर्मापुरी), हरिभाऊ अपराजित ( रामटेक), विष्णू भोयर (श्रीखंडा) सह तालुक्यातील अनेक भक्तगण प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करीत असतात. आश्रमाच्या विकासासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर , माजी जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल, माजी भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल नेहमी शासकीय निधी खेचून आणत असतात, हे विशेष!








