नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे. मनात अत्यंत वेदना आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून अजितदादांची ख्याती आहे. त्यांची एक आठवण सोबत आहे, मी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर बारामती नगरपरिषदेच्या क्षेत्रातील अतिक्रमणासंदर्भातील एक प्रकरण सुनावणीसाठी आले होते. त्या प्रकरणात त्यांनी स्वतः फोन केला व स्वतः बारामतीला येऊन प्रत्यक्ष तेथील विकासकामे पाहून संबंधित संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची विनंती केली होती.
कार्यकर्त्यांच्याप्रती त्यांची तळमळ, अत्मियेता आणि विकासाप्रती प्रामाणिकता या प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी आहेत. अशा नेत्याचे असे अकाली निधन होणे ही अत्यंत वेदनादायी आहे, असे देखील ॲड. मेश्राम म्हणाले.








