spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्याच्या विकासाला ‘बुस्टर डोस’; मुजबी ते जुना कारधा महामार्गाच्या ७९ कोटींच्या कामाची आ. डॉ. परिणय फुके यांच्याकडून पाहणी

– २१ जानेवारीपासून चौपदरीकरणाच्या कामाला होणार सुरुवात; वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देणाऱ्या आणि शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मुजबी ते जुना कारधा या ९ कि.मी. अंतराच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सखोल पाहणी केली. सुमारे ७९ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम २१ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होणार असून, यामुळे भंडारा वाशियांना वाहतूक कोंडीतून कायमचा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (NH-6) हा भंडारा शहरातून जाणारा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावर वाढलेली वाहतूक आणि होणारे अपघात लक्षात घेता, याचे चौपदरीकरण होणे अत्यंत आवश्यक होते. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आ. डॉ. फुके यांनी आज वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक सल्लागारांसोबत संपूर्ण मार्गाची पाहणी केली.

दर्जेदार काम आणि नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य

पाहणीदरम्यान आ. डॉ. परिणय फुके यांनी चौपदरीकरणाच्या आराखड्याची बारकाईने माहिती घेतली. त्यांनी रस्त्याची रुंदी, दर्जेदार डांबरीकरण, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम आणि सर्व्हिस रोडच्या रचनेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. “काम सुरू असताना स्थानिक व्यापारी, नागरिक आणि शाळकरी मुलांना त्रास होऊ नये, तसेच रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा राहील याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने काम करा,” असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिले.

९ किलोमीटरचा मार्ग, ७९ कोटींचा खर्च

या प्रकल्पाची एकूण लांबी ९ किलोमीटर असून यासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणारे हे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

या पाहणी दौऱ्यात पोलीस अधीक्षक नुरुल हसन, प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक यादव, रोड डिझाईन कन्सल्टंट अरविंद जैन, कंत्राटदार बिष्णोई यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, नगराध्यक्षा मधुरा मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, ज्योती मोगरे, सचिन कुंभलकर, भगवान बावनकर, मुस्ताक उर्फ बल्ली पटेल, प्रशांत निंबोळकर, रुबी चड्डा, अक्षय भिवगडे, अजय ब्राह्मणकर यांसह नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“भंडारा शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज पाहता हा प्रकल्प शहरासाठी जीवनवाहिनी ठरेल. कामाचा दर्जा आणि पारदर्शकता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.” – डॉ. परिणय फुके, आमदार


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.