– ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे, अपघातास नियंत्रण
– पायदळ चालणे झाले त्रासदायक
– संबंधित विभागाने लक्ष द्यावे: माजी कृउबा संचालक कृष्णा भाल
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यात ग्रामीण भागाला एकमेकांसाठी जोडलेल्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाने नेहमीच डंका मिरविणाऱ्या शासन यंत्रणेने केवळ डोळेझाक करत ग्रामीण भागातील समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा तीव्र रोष मनात ठेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दररोज सर्कस करत मार्गस्थ व्हावे लागते. रामटेक तालुक्यातील अनेक भागात सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता बांधकामाची कामे हल्ली सुरू आहेत. असे असले तरी काही भागातील अंतराचे रस्ते सुद्धा पार उखडलेल्या स्थितीत आहेत. दुचाकी सायकल स्लीप होऊन जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय नागरिकांना पायदळ चालणेदेखील कठीण झाले आहेत. परंतु बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे लक्ष नाही. आदिवासीबहुल जंगल भागातील घोटी ते सालई या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, तेव्हा या रस्त्याचे विना विलंब नूतनीकरण करावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कृष्णा भाल यांनी प्रशासनाला केलेली आहे. रामटेक ते हिवरा बाजार व पुढे मोठ्या सिमेंट रस्त्याचे काम हल्ली पूर्णत्वास येऊन पोहोचले आहे. मात्र याच मार्गावर जंगल भागात पुसदा पुनर्वसन या गावापासून गेलेला घोटी ते सालई हा रस्ता पुरता उखडलेला आहे. रस्त्यावरील गिट्टी उखडून बाहेर आलेली आहे. दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होत असतात. शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य नेतांना त्रास होतो. शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ने-आण करणारी महाराष्ट्र शासन परिवहन मंडळाची बस याच मार्गावरून हित हित भऱ्याचे दचके घेत मार्गक्रमण करीत असते. विशेषतः विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध ग्रामस्थांना त्रास होऊन कंबरेला त्रास होतो. याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. तेव्हा या रस्त्याचे विनाविलंब नूतनीकरण करावे अशी मागणी कृउबा समितीचे माजी संचालक कृष्णा भाल यांनी प्रशासनाला केलेली आहे.
काम प्रस्तावित, लवकरच पूर्ण होईल – अभियंता भोयर
हा रस्ता स्थानिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग, रामटेक अंतर्गत आहे. परवाच्या दिवशीच सदर रस्त्याची पाहणी केली. जवळपास साडेआठशे मीटर रस्ता उघडलेला असून यासाठी ५० लक्ष रुपयांचा बांधकामाचा प्रस्ताव आम्ही पाठविलेला आहे. प्रस्ताव मंजूर होताच व इतर प्रक्रिया आटोपताच लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल ‘ असे अभियंता भोयर यांनी माहिती देताना सांगितले.








