मुंबई :- राज्यातील हवामानात हळूहळू बदल जाणवू लागला असून बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा पारा घसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू होते. मात्र, मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे दिवसा उकाडा जाणवत असला, तरी पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा निर्माण झाला आहे. आगामी तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांतील किमान तापमान आणखी २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील थंडीचा प्रभावही आता वाढू लागला आहे. ऑक्टोबरच्या अखेरपासून उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये किमान तापमानात घसरण सुरू झाली आहे. सध्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरात किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. हिमालयीन भागातही थंडीचा कडाका वाढत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामसह हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतीय भागांत ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात बर्फवृष्टी झाल्यानंतर तेथून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांसह मध्य भारतावरही पडू शकतो. परिणामी, आगामी काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.
उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि त्यानंतर वाहणारे थंड वारे यामुळे राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातही गारठा वाढण्याची शक्यता असते. राज्यात सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान अधिक असल्याने दिवसा उष्णतेचा अनुभव येत आहे. तर इतर भागांमध्ये कमाल तापमान साधारण ३१ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मात्र, रात्रीच्या आणि पहाटेच्या तापमानात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
विदर्भात गोंदिया सर्वाधिक थंड
राज्यातील विविध हवामान केंद्रांवर बुधवारी नोंदविण्यात आलेल्या किमान तापमानानुसार, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जेऊरमध्ये १४, कोल्हापूरमध्ये १८, मालेगावमध्ये १४.६, नाशिकमध्ये १४.२, सांगलीत १६.२, साताऱ्यात १४.६ आणि सोलापूरमध्ये १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण विभागात रत्नागिरीचे किमान तापमान २०.४, मुंबईतील सांताक्रूझ २०, डहाणू २०, तर हर्णे येथे २३.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातही तापमानाचा पारा घसरला आहे. गोंदिया येथे राज्यातील सर्वांत कमी म्हणजे १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.७ अंशांनी कमी होते. नागपूरमध्ये १४.६, यवतमाळमध्ये १५.८, वर्धेत १५.६, वाशिममध्ये १६.४ आणि अमरावतीमध्ये १६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. आगामी दिवसांत तापमानात आणखी घट झाल्यास राज्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.





