spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

व्यसनमुक्त भारत’ घडविण्याचा निर्धार; ब्रह्माकुमारींच्या १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा कामठीत भव्य शुभारंभ

कामठी :- व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कारित भारताच्या निर्मितीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा’ कामठीत उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे तब्बल १० कोटी नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रतिज्ञा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यावेळी ब्रह्माकुमारी प्रेमलता यांनी सांगितले की, व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापने, ग्रामपंचायती तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेऊन मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट, बीडी व इतर अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

ब्रह्माकुमार डॉ. सचिन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही व्यसनातून मुक्त होण्यासाठी केवळ औषधोपचार नव्हे, तर दृढ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, आत्मजागृती आणि आध्यात्मिक शक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. राजयोग मेडिटेशन मनाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मबल प्रदान करून तणाव, नैराश्य, क्रोध व नकारात्मक सवयींवर मात करण्यास प्रभावी ठरते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित नागरिक, विद्यार्थी, युवक, शिक्षक आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सामूहिकरीत्या नशामुक्तीची शपथ घेतली. स्वतः व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजात जनजागृती करण्याचा तसेच किमान पाच नागरिकांना या अभियानाशी जोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख अतिथी डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, “व्यसनमुक्त भारताची उभारणी ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केल्यास व्यसनमुक्त, सुदृढ आणि संस्कारवान भारताची निर्मिती निश्चित होईल.” यावेळी गायत्री परिवाराचे राजेंद्र खंडेलवाल तसेच डॉ. कलंत्री यांनीही अभियानाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास माजी आमदार देवराव रडके, प्रदीप सपाटे, विमलताई साबळे, अंकिता तळेकर, घनश्याम चकोले, शेषराव अढाऊ, प्रवीण ठाकरे, मंगेश, रुपेश, रणवीर, हनुमंत, नारायण अग्रवाल, नागोराव साबळे, संगीता रेवतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रेमलता यांच्या हस्ते अभियान यात्रा प्रमुख शिलू यांना कलश व ब्रह्माकुमार मंगेश यांना ध्वज प्रदान करून नशामुक्ती जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रॅलीने कामठी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नागरिकांना “व्यसनमुक्त भारत – सशक्त भारत” हा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या समारोपात सर्वांनी राजयोग मेडिटेशनचा सामूहिक सराव करून विश्वशांती, निरोगी समाज आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी सामूहिक शुभसंकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वंदना यांनी केले, तर ब्रह्माकुमारी शिलू यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.