हिंगोली :- मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या लगतच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. अचानक काही सेकंद जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली. सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक जमीन हादरल्यामुळे भीतीपोटी अनेक भागांतील नागरिक घराबाहेर पडले.
पांगरा शिंदे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील ‘पांगरा शिंदे’ हे गाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रबिंदू हिंगोलीत असला तरी त्याची तीव्रता जास्त असल्याने त्याचा परिणाम शेजारील नांदेड जिल्ह्यावरही मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
नांदेड शहरासह परिसरात हादरे
हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागासोबतच नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र हादरे बसले. सकाळी कामाची वेळ असतानाच अचानक हा धक्का बसल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, अशी प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील या भागात गेल्या काही काळापासून सातत्याने भूगर्भातून आवाज येणे आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू आहे. आज बसलेला ४.५ रिश्टर स्केलचा धक्का तुलनेने मोठा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.








