spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता प्रोटिन पावडर आणि दारू भेसळीकडे

मुंबई :- खाद्यपदार्थ आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी धडाकेबाज कारवाया करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा तरुण वर्ग आणि मद्यात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि औषधांवर कडक कारवाई केल्यानंतर, एफडीएने आता ‘न्युट्रास्युटिकल्स’ तसेच दारूतील भेसळ रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात बोलताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाच्या या आगामी धडक मोहीमेबाबत सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत केलेल्या कारवाई, कोर्टाच्या सूचना आदींवक तुकाराम मुंढे यांनी मत मांडले.

प्रोटिन पावडरचं चेकअप

तरुण वर्गामध्ये जिम आणि फिटनेसचे क्रेझ वाढल्याने प्रोटिन पावडर व न्युट्रास्युटिकल्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता या उत्पादनांची बारीक तपासणी एफडीएतर्फे केली जाणार आहे. न्युट्रास्युटिकल्समधील मूळ घटक, उत्पादनांवरील लेबल्स आणि कंपन्यांकडून केले जाणारे दावे यांची सखोल तपासणी सुरू झाली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणाऱ्या औषध आणि सप्लिमेंट्सच्या विक्रीवर येत्या काही दिवसांत थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.

दारूमध्ये ६० टक्क्यांहून अधिक भेसळ!

एफडीएने अलीकडेच केलेल्या प्राथमिक तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील दारूमध्ये तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भेसळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मद्यपींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, या भेसळयुक्त दारूच्या साखळीवर तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्यांना सुरक्षित व शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. २००६ आणि २०११ च्या कायद्यांची राज्यात आता अत्यंत कठोर अंमलबजावणी केली जात आहे. निकृष्ट अन्नामुळे केवळ मानवी शरीरावरच परिणाम होत नाही, तर नागरिकांची कार्यक्षमता मंदावून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर थेट वाईट परिणाम होतो. त्यामुळे ही मोहीम देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

Popular Articles