spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पावसाची उघडीप ठरतेय शेतकऱ्यांसाठी धोकादायक

संदीप कांबळे,कामठी :- खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतातील पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाने उघडीप घेतल्याने ‘आभाळाकडे डोळे आणि पिकांकडे चिंता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन, धान , कापूस, तूर आदी खरीप पिकांची वाढ सुरू असून, सुरुवातीच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पावसाच्या लहरीपणाचा पिकांना फटका

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ उघडीप, त्यानंतर पुन्हा पाऊस आणि आता पुन्हा कोरडे वातावरण अशी स्थिती दिसून येत आहे. हवामानातील या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. पाऊस पडेल या अपेक्षेने शेतीची कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पिकांच्या पुढील वाढीची चिंता सतावत आहे.

कामठी तालुक्यात सोयाबीन आणि धान ही प्रमुख खरीप पिके आहेत. सध्या या पिकांना वाढीसाठी नियमित पावसाची आवश्यकता आहे. पावसाची उघडीप आणखी काही दिवस कायम राहिल्यास पिकांवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायात पावसाचे सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाने योग्य वेळी साथ दिली तर खरीप हंगाम चांगला जाण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, पावसाने आणखी दडी मारल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पाऊस कधी बरसणार, याकडे आता कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावावी, अशीच बळीराजाची आर्त अपेक्षा आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.