spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस उत्साहात साजरा

– ‘प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत’ संकल्पनेतून निरोगी जीवनशैलीचा संदेश; २०० हून अधिक मान्यवर, विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

नागपूर :- भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व मेडिकल सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल, नंदनवन, नागपूर येथील स्वास्थवृत्त व योग विभागाच्या वतीने अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वा राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस तसेच परिषदेचा ८१ वा संकल्पना दिवस १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी ‘प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. प्राकृतिक चिकित्सा, योग, संतुलित आहार आणि नैसर्गिक जीवनशैलीच्या माध्यमातून निरोगी समाजाची निर्मिती करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नागपूर- अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषदेचे क्षेत्रीय मंत्री डॉ. धनलाल शेंदरे होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर दयाशंकर तिवारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे, माजी निमा अध्यक्ष डॉ. शांतीलाल लुंगे, नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. निलेश गायधने, भूवैकुंठ आत्मानुसंधान, अड्याळ टेकडीचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचे महत्त्व विशद करताना आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर नैसर्गिक उपचारपद्धती, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यांचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी जीवनासाठी केवळ उपचारांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्यदायी सवयींचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांसह २०० हून अधिक जण उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध विषयांवरील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. योगगुरू डॉ. पंकज शुक्ला यांनी ‘दैनंदिन जीवन में योग प्राणायाम’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात योग आणि प्राणायामाचा नियमित सराव केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. केवळ योगाचे महत्त्व सांगण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायामाची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली. त्यामुळे उपस्थितांना योगाभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. त्यानंतर अभियंता रविकिरण महाजन (नियोजक – निसर्गायण मंडळ) यांनी ‘प्राकृतिक चिकित्सा वैज्ञानिक दृष्टिकोण में’ या विषयावर आपले विचार मांडले. प्राकृतिक चिकित्सा पद्धतीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता स्पष्ट करत त्यांनी निसर्गाशी सुसंगत जीवनशैली आणि नैसर्गिक उपचारपद्धतींचे महत्त्व विशद केले. डॉ. श्रद्धा प्रशांत यांनी ‘आहार चिकित्सा द्वारा कठिन रोग निर्मूलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि योग्य आहाराचे महत्त्व स्पष्ट करताना आहाराचा आरोग्यावर होणारा परिणाम, आहारविषयक योग्य सवयी आणि आरोग्य संवर्धनातील आहार चिकित्सेची भूमिका याबाबत त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध लेखन, पोस्टर निर्मिती आणि घोषवाक्य स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्राकृतिक चिकित्सा, नैसर्गिक उपचारपद्धती, योग, आरोग्यदायी आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. पोस्टर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूणच या उपक्रमाच्या माध्यमातून प्राकृतिक चिकित्सा ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची एक महत्त्वपूर्ण दिशा असल्याचा संदेश देण्यात आला. योग, प्राणायाम, संतुलित आहार, निसर्गाशी सुसंगत जीवनशैली आणि आरोग्यविषयक जागरूकता या गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास निरोगी समाजनिर्मितीला निश्चितच हातभार लागू शकतो, हा विचार कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे, स्वास्थवृत्त व योग विभागप्रमुख डॉ. माधवी रेहपाडे, डॉ. ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने, डॉ. शरयू डिंगल्लवार, डॉ. रूपाली भणारे, डॉ. स्नेहल भामकर, डॉ. प्रमोद माळवे, डॉ. निखिल भुते आणि डॉ. राहुल गड्डमवार यांच्यासह आयोजक समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles